Ticker

6/recent/ticker-posts

आपली आवड ओळखून त्याला कष्टाची जोड आवश्यक - श्रीकृष्ण कोकाटे

 



▪️नांदेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिरात

सहभागी युवकांना पोलीस अधिक्षकांचा गुरुमंत्र 


नांदेड :- दहावी व बारावीची परीक्षा दिल्यानंतर करिअर घडविण्याची जबाबदारी ही पालकावर नाही तर विद्यार्थी म्हणून प्रत्येकावर येवून पडते. आपल्या उज्वल भवितव्यासाठी युवकांनी सर्वप्रथम स्वत:ला ओळखले पाहिजे. आपली आवड काय आहे याचा निर्णय स्वत: हाच घेतला पाहिजे. ज्यावेळेला ही प्रक्रीया प्रत्येक विद्यार्थी स्वत: हून पार पाडेल त्या दिवसापासून तुमचे भवितव्य अर्थात करिअर घडण्यास सुरुवात झाली हे आत्मविश्वासाने समजून घ्या, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी युवकांना केले.


आज नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सहसंचालक सतिश सुर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या सह आयुक्त रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती.


आयुष्याचा मार्ग शोधताना कोणत्याही विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती असणे स्वाभाविक आहे. या द्विधा मनस्थितीतून मी ही गेलेलो आहे. बीएससीला घेतलेले ॲडमिशन रद्द करुन मी शेवटी बीकॉमपर्यत पोहोचलो. बीकॉम यासाठी की मला युपीएससीची तयारी करता यावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवला. यासाठी क्लासेस लावले. पहिल्या टप्प्यात माझा अभ्यास न झाल्याने मी परीक्षा दिली नाही. घरचे नाराज झाले. माझ्या मित्राने मला स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला. त्याच्या नोट्सवरुन माझा आत्मविश्वास वाढला. नंतरच्या परीक्षेत मी इतरापेक्षा अधिक मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले.


माझे मी ध्येय निश्चित केल्यानंतर कुणाकडेच पाहिले नाही. राहणीमान व भौतिक सुविधा याला शुन्य महत्व देवून अभ्यासाला प्राधान्य दिल्यामुळे  मी या पदापर्यंत पोहोचू शकलो अशी अनुभवाची शिदोरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना दिली. पॅशन, डेडीकेशन, डिव्होशन, डिस्परेशन याबाबी आपल्या यशाची गुरुकिल्ली आहेत हे युवकांनी विसरता कामा नये हे त्यांनी स्पष्ट केले.


18 वर्षापासून 25 वर्षापर्यंत जे अपार कष्ट घेतात, मेहनत करतात त्याची पुढची 50 वर्षे ही राजासारखी असतात या शब्दात मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी युवकांना यशाचे महत्व पटवून दिले. आयुष्यातील हा तुमचा अत्यंत महत्वाचा काळ आहे. शिक्षणासमवेत आपल्या भोवताली असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधी तपासून घेतल्या पाहिजे. मोबाईलच्या आहारी न जाता त्या वेळेचा सदउपयोग आपल्या करियरच्या दृष्टीने इतर वाचनामध्ये विद्यार्थ्यांनी द्यावा असे ते म्हणाले. उद्घाटनाच्या पहिल्या सत्रानंतर अनेक मान्यवरांची यावेळी समयोचित भाषणे झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement