Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीची जागा 'उबाठा' ला,यामागे जयंत पाटीलच,माजी आमदारांचा दावा

 


सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात चांगलीच धुसफूस पाहायला मिळाली. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाने आपल्या ताब्यात ठेवून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेस इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगलीच्या वादाचे खलनायक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, असा गंभीर आरोप जत तालुक्यातील माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे.

जतमध्ये विशाल पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी बोलताना सांगलीतून विशाल पाटील यांना डावलण्यामागे जयंत पाटील यांची खेळी असल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केला.

"सगळ्या महाराष्ट्राची तिकीटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. मात्र आज त्यांच्याच नातवाला दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागतात, ही दुःखाची बाब आहे. काँग्रेसमध्ये काय चाललंय? कोणाचं ऐकून तुम्ही करता?" असा प्रश्न विलासराव जगतापांनी विचारला.

"या सगळ्यात कळीचा नारद कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. ही सर्व खेळी जयंत पाटील यांनी केली. सांगलीची जागा काँग्रेसकडून जाण्याच्या खेळीत जयंत पाटील खलनायक आहेत. संजय राऊत यांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी ही सगळी खेळी रचली. सांगली जिल्ह्यातून वसंतदादा पाटील यांचं घराणं संपवण्याचा घाट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने घातला आहे, मात्र आपल्याला त्यांच्या कुटुंबासोबत राहायचं आहे" असंही विलासराव जगताप म्हणाले.

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला होता. सुरुवातीला चर्चेच्या काही फेऱ्या झाल्यानंतर ठाकरेंनी परस्पर पैलवान चंद्रहार पाटील यांना तिकीट जाहीर केलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास आग्रही होते. परंतु हा तिढा न सुटल्याने चंद्रहार पाटीलच मविआचे अधिकृत उमेदवार ठरले आणि त्यांनी उमेदवारी अर्जही भरला.

दुसरीकडे विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. अंतिम मुदम उलटल्यानंतरही त्यांची उमेदवारी कायम राहिल्याने येथील लढत तिरंगी असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. त्यामुळे ते आपला गड टिकवतात का हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement